स्पर्श अहेतुक झाला होता असे वाटले
सहज जवळ तो आला होता असे वाटले ||धृ||
नयनी लज्जा, अनाहूत गालावर लाली
तप्त श्वास अन् उरात धडधड सोबत आली
एकटाच तो आला होता असे वाटले ||१||
स्वागत करण्यासाठी लज्जित शब्द जुळवले
अबोध ओठांवरुनी त्याने अलगद टिपले
मद्याचा तो प्याला होता असे वाटले ||२||
अशाच गाठीभेटी व्हाव्या सांज-सकाळी
अशीच व्हावे राधा मी अन् तो वनमाळी
पावा हृदयी घुमला होता असे वाटले ||३||