ज्याला कधी पाहिले नाही त्याची दिनरात आळवणी केली
परमार्थाची भौतिकाहून अधिक काळजी केली
स्वर्ग-नरकाच्या वांझोट्या काळजीत
इहलोकीचा रसमयी आस्वाद घ्यायचे राहून गेले
तुझा दुर्लक्षित रुसवा दूर करण्याचे राहून गेले
टाळ-मृदुंगाच्या तालावर बेधुंद नाचताना
भक्तिसुधेचे आकंठ पान करताना
हरिनामाचा आर्त गजर करताना
तुला एखादी मंजुळ साद घालण्याचे राहून गेले
रंध्रारंध्राचा अंतर्नाद ऐकण्याचे राहून गेले
तुझा दुर्लक्षित रुसवा दूर करण्याचे राहून गेले
चूक-बरोबरचा हिशेब मांडून थकते
दरवेळी निराळे उत्तर निघते
इतके सारे करूनही तुझ्यावाचून
तो पूजा माझी स्वीकारत नाही
सारे पुण्य म्हणे या एका पापापायी वाहून गेले
तुझा दुर्लक्षित रुसवा दूर करण्याचे राहून गेले
विसरून गेले होते की माणसांत देवत्व नसतं
अठ्ठाविस युगं तिष्ठण्याचं
विसरून गेले होते की ऐहिक प्रेमाची ज्योत
सहवासाविना क्षीण होऊ लागते
तुला ग्रासत चाललेला काळोख उजळण्याचे राहून गेले
या समईची तेलवात करायचे राहून गेले
तुझा दुर्लक्षित रुसवा दूर करण्याचे राहून गेले
एकटेपणाला आता कितीही गोंजारले तरी
तुझ्या स्पर्शाची उत्कट सर त्याला येत नाही
धुपाचा उग्र वासही आठवणीतल्या
तुझ्या गंधावर मात करू शकत नाही
त्या गंधाला,त्या स्पर्शाला,
मार्गातील साया अडथळ्यांना, सहज ओलांडल्याचा भ्रम
त्या भ्रमाने काही काळ भारावून गेले
कपाळीचे कुंकू तुझ्या अंगावर आवेगाने उमटवण्याचे राहून गेले
तुझा दुर्लक्षित रुसवा दूर करण्याचे राहून गेले