Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

त्याचे येणे

स्पर्श अहेतुक झाला होता असे वाटले
सहज जवळ तो आला होता असे वाटले ||धृ||

नयनी लज्जा, अनाहूत गालावर लाली
तप्त श्वास अन्‌ उरात धडधड सोबत आली
एकटाच तो आला होता असे वाटले ||१||

स्वागत करण्यासाठी लज्जित शब्द जुळवले
अबोध ओठांवरुनी त्याने अलगद टिपले
मद्याचा तो प्याला होता असे वाटले ||२||

अशाच गाठीभेटी व्हाव्या सांज-सकाळी
अशीच व्हावे राधा मी अन्‌ तो वनमाळी
पावा हृदयी घुमला होता असे वाटले ||३||

कैकदा मागे मनाने ओढले होते
पण अनावर शेवटी ते चोचले होते

पाप नक्की काय असते, एकदा ठरवा
कोणत्या मापात मजला मोजले होते?

जे मला भोगी समजले, अज्ञ ते होते
भोग जे नशिबात होते, भोगले होते

चांगले ठाऊक आहे मोल नियमांचे
मोडण्याचे दाम पुरते मोजले होते

वाममार्गीही न त्यांना टाळता आले
त्या तिथे आधीच सज्जन पोचले होते

काळजी कसली करावी ह्या शरीरांची
कावळ्यांचे पिंड ज्यावर पोसले होते

परकी

सभोवताली सारे जेव्हा भिजले होते
काही तुषार माझ्यावरही उडले होते

सचैल न्हाणे कधीच नव्हते नशिबी माझ्या
सहवासाचे थेंब जरा शिंपडले होते

जिथून झाल्या आयुष्याच्या विभक्त वाटा
पुढे पाउले गेली, मन घुटमळले होते

धूळ पाहुनी बसेल का विश्वास कुणाचा
कधी तरी हे वाळवंट मोहरले होते

बाळ-पाळणा, विवाह-वेदी, चिता चंदनी
कशास सारे? ह्याविण काही अडले होते?

अनामिकांच्या वारीमधली एक प्रवासी
रिंगण जन्माआधिच माझे ठरले होते

मना, आपले-परके तू ह्यावरून ओळख
मेले तेव्हा दु:ख एकटे रडले होते

पुन्हा पुन्हा पडायचे, उठायचे पुन्हा पुन्हा
पदोपदी दुभंगुनी जुळायचे पुन्हा पुन्हा

कुणी किती करोत घाव, तू नको धरू मनी
हृदय विशाल आपले करायचे पुन्हा पुन्हा

सरेल खिन्न काळ अन् निवेल दुःख प्रीतिचे
फिरून जीवनी वसंत यायचे पुन्हा पुन्हा

स्वतःच शुक्र हो, स्वतःच धृव हो नभांगणी
मळभ मनावरी असेच यायचे पुन्हा पुन्हा

फकीर होउनी हिमालयास चालल्यावरी
घराकडे वळून का बघायचे पुन्हा पुन्हा ?

अगर स्मृतींमुळे नजर अधू न होउ द्यायची
तुझेच तू मनःपटल पुसायचे पुन्हा पुन्हा

रडून घे बसून एकटीच एकदाच तू
जगासमोर, मृण्मयी, हसायचे पुन्हा पुन्हा

डोळे

जाल फेकणे, शिकार करणे शिकू लागले डोळे
उगाच का माझ्यावर सारे खिळू लागले डोळे ?

सलज्ज झुकणे कुठे हरवले प्रवाहात काळाच्या ?
उघड उघड शारीर दवंडी पिटू लागले डोळे

नको, नको ते खूप पाहिले, विझू लागले डोळे
इतकी हसले आयुष्याला, भिजू लागले डोळे

वही गुलाबी गालांची अन्‌ स्वप्नभंग प्रेरणा
काजळ-अश्रूंच्या शाईने लिहू लागले डोळे

मुक्ताई मी, मीच जनी, आणि पतित कान्होपात्रा
तुझ्या पाउली अखेर माझे, विठू, लागले डोळे

स्पर्श

  • स्पर्श ओझरता पुन्हा रोमांचित करून गेला
    वाटले होते ऋतू फुलण्याचा सरून गेला

    मस्तकाला एकदा स्वप्नी चुंबिले सख्याने
    सप्तरंगी भाकिते भाळी उमटवून गेला

    दरवळाया लागल्या श्वासांच्या लडी असाव्या
    माळलेला मोगरा केव्हाचा सुकून गेला

    पालवी फुटली अचानक वठल्या तनामनाला
    अंतरी कोणीतरी अमृत शिंपडून गेला

    थेंब रुजला स्वातिचा, घडला शिंपल्यात मोती
    चंद्र जेव्हा अंतरी अलगद विरघळून गेला

  • आधार

    ज्यास प्रेमाचे न कोंदण, तो मुळी शृंगार नाही
    ज्यास मोहाची न झालर, प्रीत पूर्णाकार नाही

    रेशमी, उत्कट मिठीने बांधुनी ठेवू कशाला ?
    कैद इच्छेवीण करण्या प्रेम कारागार नाही

    खेळुनी गेलास माझ्या भावनांशी, जीवनाशी
    अन्‌ तरी दावा तुझा, हे प्रेम, हा व्यभिचार नाही…

    दाह विरहाचा तुझ्या जाळील सर्वांगा तरीही
    दग्ध होण्याच्या भितीने ह्यापुढे अविचार नाही

    जागणे खाल्ल्या मिठाला भूषणास्पद खास अहे
    आसवांना जागते मी; सांग, अश्रू क्षार नाही ?

    दे नजर नजरेस आता, राहिला धोका न काही
    वाहुनी निवलेत डोळे, जाळण्या अंगार नाही

    आजवर मी मौन होते, हीच माझी चूक झाली
    एव्हढेही बोलण्याचा का मला अधिकार नाही ?

    मी तुझ्या दारी कशाला याचना घेऊन येऊ ?
    प्रीतिची भिक्षा नको, मी एव्हढी लाचार नाही

    रोज मातीमाय पोटी घेतसे लाखो जिवांना
    कोण म्हणतो मृण्मयीला ह्या जगी आधार नाही ?

    कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही
    कधी आषाढ-ओल्या आठवांनी नाहले नाही

    तसे लक्षात येण्यासारखे नव्हतेच हे फुलणे
    कुणी अंजारले नाही, कुणी गोंजारले नाही

    कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
    झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?

    जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
    जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही

    जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
    तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?

    वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
    कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही

    अपघात

    तुझा हात आला हाती अपघाताने
    कुणी जोडली ही नाती अपघाताने ?

    किती रुक्ष होता माझा निर्जन रस्ता
    मिळालास तू सांगाती अपघाताने

    सुन्या मैफिलीचा झाला प्रीतीजलसा
    उजळताच नयनी वाती अपघाताने

    कुणी नाव का चंद्राचे घेतो आहे ?
    उजळल्या तमोमय राती अपघाताने

    कसे शब्द साधे माझे मोती झाले
    असावी शिरावर स्वाती अपघाताने

    अशा, मृण्मयी, आल्या वळवाच्या धारा
    भिजे चिंब न्हाती माती अपघाताने

    नांदी

    चंद्र पुनवेचा, असावी तीट वर काळ्या ढगाची
    भूषवी डोळ्यास जैसी गर्द महिरप काजळाची

    सागराच्या सोबतीने सोड, नौके, तू किनारा
    उसळत्या लाटात त्याच्या धुंद नांदी वादळाची

    सोसवे ना दाह विरहाचा, सख्या, येशील केव्हा ?
    हा न गात्रांचा पुकारा, ही विनवणी काळजाची

    तप्त केले, उजळले सर्वांग ज्याने कांचनासम
    त्या तुझ्या स्पर्शास केवळ एक उपमा – पारसाची!

    बोलला पाऊस पहिला मृण्मयीला चुंबताना
    वर्षभर वेडावते मज आठवण मृद्-सौरभाची

    जरा जुन्या पोस्ट्स »

    Follow

    Get every new post delivered to your Inbox.